पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात सुरक्षा दलांना लक्ष्य करत दोन स्वतंत्र हल्ले झाल्याचा दावा करण्यात आला आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मी अर्थात बीएलएने या दोन्ही कारवायांची जबाबदारी स्वीकारत २५ पाकिस्तानी लष्करी जवान ठार झाल्याचे म्हटले आहे. मात्र, या मृतांची संख्या पाकिस्तान सरकारकडून अधिकृतपणे पुष्टी करण्यात आलेली नाही.
बीएलएच्या माहितीनुसार, पहिला हल्ला झियारत क्रॉस परिसरात पाकिस्तानी लष्करी ताफ्यावर करण्यात आला. या हल्ल्यात दोन लष्करी वाहने नष्ट झाल्याचे आणि १८ जवान ठार झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.
दुसऱ्या घटनेत सुरब जिल्ह्यातील हाजिका परिसराला लक्ष्य करण्यात आल्याचे बीएलएने म्हटले आहे. या कारवाईत आणखी सात पाकिस्तानी लष्करी जवान ठार झाल्याचा दावा करण्यात आला आहे. दोन्ही हल्ल्यांतील मृतांची संख्या एकत्रित करून बीएलएने २५ जवानांचा आकडा जाहीर केला आहे.
या कारवायांमध्ये एकूण तीन लष्करी वाहने नष्ट केल्याचाही दावा बीएलएकडून करण्यात आला आहे. संघटनेने हल्ल्यांशी संबंधित व्हिडीओ फुटेजही प्रसिद्ध केले आहे. मात्र, या दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली नसल्याने मृतांचा नेमका आकडा स्पष्ट झालेला नाही.
दरम्यान, या घटनांनंतर पाकिस्तानच्या सुरक्षा दलांनी बलुचिस्तानमध्ये विविध ठिकाणी कारवाया केल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी लष्कराने मागील ७२ तासांतील कारवायांमध्ये ४८ दहशतवादी ठार केल्याचा दावा केला आहे.
बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सुरक्षा दल आणि बलुच फुटीरतावादी संघटनांमध्ये दीर्घकाळापासून संघर्ष सुरू आहे. ताज्या हल्ल्यांमुळे या भागातील अस्थिरता आणि सुरक्षा आव्हान पुन्हा चर्चेत आले आहे.
बीएलएच्या दाव्याची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नसल्याने पुढील तपास आणि पाकिस्तानकडून येणाऱ्या अधिकृत माहितीकडे लक्ष लागले आहे.